Rain Update: या महिन्यात महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची (मध्यम) शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चांगला पाऊस पडण्याचे संकेत असून त्यामुळे काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update: मुंबईसह जवळच्या इतर शहरांमध्ये 2 ऑक्टोबरची सुरुवात मुसळधार पावसाने झाली. पावसाचा हा शेवटचा हंगाम आहे.काही दिवसात महाराष्ट्रातून मान्सून माघारी जायला सुरुवात करेल. मात्र, पावसाळा संपण्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर आजपर्यंतही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. ऑगस्टमध्ये काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आता पुढे पाऊस कसा राहील? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हवामान खात्याने सोमवारी महाराष्ट्रातील 25 हून अधिक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या काळात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असून वादळासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याच वेळी, 22 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेथे वादळासह मेघगर्जनेची शक्यता आहे.
या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी
शनिवारी दिवसभर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू होता. IMD ने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सांगली, नागपूर, गोंदिया आणि अहमदनगर आदी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
परतीच्या पावसाला लवकरच होणार सुरुवात
यंदा भारतातील मान्सूनचा कालावधी संपला असून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातून मान्सून परतला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमधील विविध भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिलेली आहे.